पुनस हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात निर्सगाच्या सानिध्यात वसलेले गाव आहे. ग्रामपंचायत पुनस ही पुनस, गौतमगाव, वेसुर्ले आणि चाफेट या चार महसुली गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून पूर्वेकडे सुमारे २५ किमी आणि लांजा या तालुक्याच्या ठिकाणापासून उत्तरेकडे सुमारे १३ किमी अंतरावर पुनस हे गाव वसलेले आहे. उत्तरेकडे असोडे आणि कडुगाव, पश्चिमेकडे निवसर आणि उपळे, दक्षिणेकडे गवाणे आणि पूर्वेकडे कुर्णे ही पुनस ग्रामपंचायत हद्दीच्या शेजारील गावे आहेत. गावाच्या उत्तर सीमेवरून काजळी नदी वाहते.
पुनस, गौतमगाव, चाफेट आणि वेसुर्ले ही गावे एकूण १३९८ हेक्टर एवढ्या क्षेत्रात पसरलेली असून चारही गावांची एकूण लोकसंख्या २४०५ एवढी आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध असे सर्व समाजाचे लोक या गावांमध्ये राहतात. श्री नवलाई देवी मंदिर हे पुनसचे ग्रामदैवत आहे. श्री चाफोबा देव मंदिर, श्री दुर्गादेवी मंदिर, श्री सांब मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री भवानी देवी मंदिर अशी अनेक देवस्थाने व श्रद्धास्थाने या गावात आहेत.